नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (West Bengal Assembly Election 2021) सर्व राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय पक्षांकडून सभांमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. तर अनेक नेतेमंडळी पक्षांतर करताना दिसत आहे. याच दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये ममता दीदींच्या जवळचे मानल्या जाणाऱ्या काही इच्छुक उमेदवारांची तिकिटं कापली गेली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक जण तिकीट कापल्यामुळे नाराज झाले आहेत. दक्षिण 24 परगणामधील भानगर भागातले पक्षाचे नेते अराबुल इस्लाम यांना तिकीट नाकारण्यात आलं आहे. नेत्याल तिकीट नाकारल्याने कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत. कार्यकर्त्यांनी चक्क पक्ष कार्यालयातील सामानाची जाळपोळ केली आहे. कार्यालयातील लाकडी खुर्च्याची तोडफोड करून त्या भररस्त्यात जाळल्याची घटना समोर आली आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आपला निषेध व्यक्त केला आहे.
"गेल्या 10 वर्षांपासून मी ममता दीदींसोबत", बंगाली अभिनेत्री सायंतिका बॅनर्जी यांचा TMCमध्ये प्रवेश
बंगाली अभिनेत्री सायंतिका बॅनर्जी (Syantika Banerjee) यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला आहे. टीएमसीचे महासचिव पार्थ चॅटर्जी, मंत्री सुब्रत चॅटर्जी आणि ब्रात्य बसु यांच्या उपस्थितीत सायंतिका यांनी पक्षात प्रवेश केला आहे. सायंतिका बॅनर्जी यांनी टीएमसीमध्ये प्रवेश करताच भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बंगालला केवळ ममता दीदी हव्या आहेत. "मला ही संधी दिल्याबद्दल ममता बॅनर्जी यांचे मनापासून आभार. मी आज अधिकृतरित्या TMC मध्ये प्रवेश केला. मात्र खरं सांगायचं झालं तर गेल्या 10 वर्षांपासून मी ममता दीदींसोबत आहे. हीच वेळ आहे मतदारांकडे आपलं भविष्य उज्वल करण्याची. बंगालला फक्त बंगालची मुलगी हवी आहे. बंगालला केवळ ममता बॅनर्जी हव्या आहेत" असं सायंतिका बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
बंगाली अभिनेत्री श्राबंती चॅटर्जी (Bengali actor Srabanti Chatterjee) यांनी देखील राजकारणात उडी घेतली आहे. त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री श्राबंती चॅटर्जींनी भाजपात प्रवेश केला. पश्चिम बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि पक्षाचे निवडणूक प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत अभिनेत्री श्राबंती चॅटर्जी यांचा पक्षप्रवेश झाला. त्यामुळे आता भाजपाकडून त्यांना विधानसभेचे तिकीट मिळणार की त्या स्टार प्रचारक म्हणून काम करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. श्राबंती चॅटर्जी यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.
"...म्हणून मला वाटतं की, भाजपाला एक संधी मिळायला पाहिजे", श्राबंती चॅटर्जींनी व्यक्त केल्या भावना
"मला भाजपाची विचारधारा प्रभावित करते. मला पंतप्रधान मोदींचे व्हिजन प्रभावित करते" असं श्राबंती यांनी म्हटलं आहे. "मला तृणमूल काँग्रेसमधून कोणताही प्रस्ताव आला नाही. हा, मी दीदींचा (ममता बॅनर्जी) आदर करते. दीदींसोबत मी एकाच व्यासपीठावर राहिली आहे. त्यांच्यासोबत प्रचारसाठीही गेले आहे. पण मला भाजपाची विचारधारा प्रभावित करते. मला पंतप्रधान मोदींचे व्हिजन प्रभावित करते" असं श्राबंती चॅटर्जी यांनी म्हटलं आहे. "पश्चिम बंगालमध्ये 34 वर्षे डाव्या पक्षाने आणि 10 वर्ष तृणमूल काँग्रेसने सत्ता चालवली आहे. पण जितका विकास बंगालमध्ये व्हायला हवा होता, तितका तो झालेला नाही. मला वाटत आमच्या सोनार बांगलाचा विकास व्हायला हवा. त्यामुळे मला वाटतं की, भाजपाला एक संधी मिळायला पाहिजे" असं श्राबंती चॅटर्जी यांनी म्हटलं आहे.