ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - नराधम डॉक्टरामुळे गर्भवती झालेल्या १४ वर्षाच्या पिडीत मुलीला गर्भपात करण्यास डॉक्टरांच्या समितीने हिरवा कंदील दाखवल्यानंतर सुप्रीम कोर्टानेही गर्भपातास मंजुरी दिली आहे. पिडीत मुलगी ही २५ आठवड्यांची गर्भवती होती.
गुजरातमधील १४ वर्षाच्या मुलीला काही महिन्यांपूर्वी टायफॉईड झाला होता व उपचारासाठी ती डॉ. जतीनभाई मेहता याच्याकडे गेली होती. या नराधम डॉक्टराने त्या मुलीवर बलात्कार केला होता. या दरम्यान पिडीत मुलगी गर्भवती झाली. गुजरात हायकोर्टाने पिडीत मुलीच्या गर्भपातास नकारदिला होता. याप्रकरणी पिडीत मुलीच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाने नियमाविरोधात जाणार नाही असे सांगत सुरुवातील गर्भपातास नकार दिला. मात्र त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने या संदर्भात स्त्रीरोग तज्ज्ञ व मानसोपचारतज्ज्ञ अशा पाच जणांची समिती नेमली. या समितीने गर्भपातास परवानगी दिली तर आम्हीदेखील परवानगी देऊ अशी भूमिका कोर्टाने घेतली होती. गर्भपातापूर्वी गर्भातील बाळाची डीएनए चाचणी करावी यामुळे बलात्कार प्रकरणात महत्त्वाचा पुरावा हाती येईल असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. या समितीने मुलीची तपासणी केली. गर्भपातामुळे पिडीत मुलीच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होणार नाही, ती शारीरिक दृष्ट्या फिट असल्याचे या समितीने म्हटले होते. या आधारे सुप्रीम कोर्टाने गर्भपातास परवानगी दिली.