नवी दिलेली - गेल्या 20 ते 22 दिवसांपासून मेघालयमधील खाणीत अडकून पडलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी सुरू असलेल्या बचावकार्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. कोळशाच्या खाणीत अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी सुरू असलेले बचाव कार्यासाठी उचलण्यात आलेली पाऊले अपुरी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मेघालय सरकारला सांगितले आहे. मेघालयमधील कोळशाच्या खाणींमध्ये हे 15 मजूर गेल्या 13 डिसेंबरपासून अडकून पडले आहेत. खाणीत अडकून पडलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात अद्याप यश का आलेले नाही, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.के. सिकरी आणि न्यायमूर्ती अब्दुल नझीक यांच्या खंडपीठाने मेघालय सरकारकडे केली आहे. यादरम्यान, न्यायालयात हजर असलेल्या वकिलांनी खाणीत अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले जात असून, केंद्र सरकारकडूनही मदत मिळत आहे, असे न्यायालयाला सांगितले. मात्र सध्या सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत आम्ही संतुष्ट नाही. इथे खाणीत अडकलेल्या 15 मजुरांच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. असे न्यायमूर्तींनी राज्य सरकारच्या वकिलांना सुनावले. तसेच या प्रकरणी योग्य ते आदेश देता यावेत यासाठी केंद्राच्या अॅटर्नी जनरलनाही न्यायालयात बोलावण्याचे आदेश न्यायमूर्तींनी दिले.
मेघालयमधील खाणीत अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठीचे बचावकार्य अपुरे, सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 2:11 PM