नवी दिल्ली: वृद्ध पालक त्यांचा सांभाळ करणाऱ्या अपत्याला संपत्तीत अधिक वाटा देऊ शकतात, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. देखभाल करणाऱ्या अपत्याला त्याच्या भावंडांच्या तुलनेत जास्त संपत्ती दिली जाऊ शकते, असं न्यायालयानं एका प्रकरणात निकाल देताना म्हटलं. एखाद्या वृद्ध पालकानं अशा प्रकारे अपत्याला संपत्तीत अधिक वाटा दिल्यास त्याला वयाचा फायदा घेऊन संपत्ती नावे केली असं म्हणता येणार नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलं. १९७० च्या दशकातील एका प्रकरणात न्यायालयानं हा निर्णय दिला.भावंडांमध्ये चाललेल्या संपत्तीच्या वादात न्यायमूर्ती नवीन सिन्हा आणि इंदिरा बॅनर्जी यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिला. 'कोणत्याही महत्त्वपूर्ण साक्षीशिवाय या निष्कर्षावर (पालकांच्या वयाचा फायदा घेऊन संपत्ती नावे करणे) पोहोचणं योग्य होणार नाही. त्यामुळे चुकीचा संदेश जाऊ शकतो. एखादं अपत्य आई वडिलांचा नीट सांभाळ करत नसेल, मात्र त्याच व्यक्तीचं भावंड पालकांची नीट काळजी घेत असेल, तर त्या भावंडाला पालक संपत्तीत जास्त वाटा देऊ शकतात,' असं न्यायालयानं निकालात म्हटलं. एखाद्या अपत्यानं केवळ संपत्तीत अधिक वाटा मिळवण्यासाठी आपल्या मातापित्याची काळजी घेतली, असं म्हटलं जाऊ शकत नाही, हेदेखील न्यायालयानं स्पष्ट केलं. संपत्तीच्या वाटणीवर गेल्या ५ दशकांपासून एक प्रकरण न्यायप्रविष्ट होतं. वडिलांच्या मृत्यूनंतर वर्षभरातच भावांमधून वाद सुरू होता. वडिलांनी त्यांच्या संपत्तीतला मोठा वाटा एका मुलाला दिला होता. वडिलांच्या वयाचा गैरफायदा घेऊन संपत्तीतला अधिक वाटा घेतल्याचा आरोप इतर भावंडांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र सत्र न्यायालयापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयानंही भावंडांच्या विरोधात निकाल दिला.
Acts For Senior Citizens : सांभाळ करणाऱ्या अपत्याला पालक देऊ शकतात अधिक संपत्ती- सर्वोच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 10:40 AM