Sadhguru Jaggi Vasudev : सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाऊंडेशनला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने ईशा फाऊंडेशनवरील सर्व कारवाई बंद केली आहे. एका माजी प्राध्यपकाने याचिकेत त्याच्या दोन मुलींचे ब्रेनवॉश करून त्यांना जग्गी वासुदेव यांच्या कोईम्बतूर येथील ईशा फाऊंडेशनमध्ये राहण्यास भाग पाडले गेले होते असा आरोप केला होता. सुप्रीम कोर्टाने ईशा फाउंडेशनच्या विरोधात उच्च न्यायालयात सुरू असलेली कारवाई रद्द केली आहे. मात्र, या निर्णयाचा परिणाम या प्रकरणापुरता मर्यादित राहील, असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले आहे.
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने दोन्ही महिला प्रौढ असल्याचा निर्णय दिला. "आम्ही दोन्ही महिलांशी बोललो आणि त्यांचे रेकॉर्डिंग केले. त्या दोघांनी सांगितले की ते त्या स्वेच्छेने तेथे राहतात आणि आम्हाला याचिका बंद करण्याची आवश्यकता आहे," असे खंडपीठाच्या अहवालानुसार सरन्यायाधीश म्हणाले. खंडपीठाने हे देखील स्पष्ट केले की त्यांचा आदेश पोलिसांना कोणत्याही तपासापासून रोखणार नाही.
याप्रकरणी निकाल देताना सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, आश्रमात काही कमतरता असल्यास तामिळनाडू सरकार त्याकडे लक्ष देऊ शकते. वडीलही त्यांच्या मुलींना भेटू शकतात. तसेच ते पोलिसांसोबत तेथे जाऊ शकत नाही. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी म्हटलं की आम्ही वडिलांशीही बोललो आणि त्यांना सांगितले की ते त्यांच्या मुलींच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. याचिका दाखल करण्यापेक्षा त्यांचा विश्वास जिंकला पाहिजे, असे खंडपीठाने म्हटलं.
अशा याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश देणे पूर्णपणे अयोग्य असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. मुलींच्या वडिलांची याचिका चुकीची आहे, कारण दोन्ही मुली प्रौढ आहेत आणि ते तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील आश्रमात स्वत:च्या इच्छेने राहत आहेत, असेही खंडपीठाने म्हटलं. अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने या महिलांच्या वडिलांनी दाखल केलेला खटला बंद केला.
दरम्यान, निवृत्त प्राध्यापक एस. कामराज यांनी त्यांच्या दोन मुलींना ईशा फाऊंडेशनमध्ये ब्रेनवॉशिंग करून ठेवण्यात आल्याचे म्हटलं होतं. तसेच मुलींना ईशा फाऊंडेशनकडून संसारात न रमता संन्यासी जीवन जगण्यास सांगितले होते. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर न्यायमूर्तींनी स्वतःच्या मुलीचं लग्न लावणारा इतरांच्या मुलींना इतर तरुणींना संसाराचा त्याग करून संन्याशांसारखं जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन का देत आहेत?, असा सवाल सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या वकिलाला विचारला होता. त्यानंतर तामिळनाडू पोलिसांनी ईशा फाऊंडेशनच्या योगा केंद्रामध्ये छापे टाकले होते. त्यानंतर ईशा फाऊंडेशनने सुप्रीम कोर्टातून पोलिसांच्या छाप्यावर स्थगिती आणली होती.