देशाचे पुढील सरन्यायाधीश कोण? यावरून आता पडदा हटला आहे. येत्या चार महिन्यांत देश तीन सरन्यायाधीश बदललेले पाहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी पुढील सरन्यायाधीश पदासाठी न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांच्या नावाची शिफारस केली आहे. हे शिफारस पत्र रमणा यांनी कायदा आणि न्याय मंत्र्यांकडे सोपविले आहे.
न्यायमूर्ती यू यू ललित यांच्या नावाची शिफारस मान्य झाल्यास ते देशाचे ४९ वे सरन्यायाधीश बनतील. रमणा हे २६ ऑगस्टला निवृत्त होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांच्या ज्येष्ठतेच्या आधारावर सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतात. सरन्यायाधीश म्हणून कोणताही निश्चित कार्यकाळ नसतो. परंतू सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय संविधानानुसार ६५ वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
विचित्र योगायोग...चार महिन्यांत देशाला तीन सरन्यायाधीश दिसणार आहेत. न्यायमूर्ती उदय उमेश ललित आणि न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड हे देशाचे पुढील सरन्यायाधीश असतील. जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत दोघेही निवृत्त होणार आहेत. असाच योगायोग पाच वर्षांनी म्हणजेच २०२७ मध्ये होणार आहे. 2027 मध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर या दोन महिन्यांत तीन सरन्यायाधीश येतील आणि जातील.
पहिली महिला सरन्यायाधीश मिळणार...परंपरा आणि प्रथेनुसार 27 सप्टेंबर 2027 रोजी न्यायमूर्ती विक्रम नाथ सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होतील. यानंतर देशाला पहिली महिला सरन्यायाधीश मिळणार आहेत. न्यायमूर्ती बीव्ही नागरथना या ३५ दिवस देशाच्या सरन्यायाधीश असतील. यानंतर न्यायमूर्ती पीएस नरसिंह 31 ऑक्टोबर 2027 पासून सहा महिने आणि तीन दिवसांसाठी सरन्यायाधीश होतील.