Maharashtra Politics: सलग तीन दिवसांपासून राज्यातील सत्तासंर्घषाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. तीन दिवसांपासून ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि मनु सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद केला. पुढील सुनावणीत शिंदे गटाला युक्तिवाद करण्यासाठी पुरेसा वेळ न्यायालयाकडून दिला जाणार आहे. मात्र, ठाकरे गटाचा युक्तिवाद सुरू असताना सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या एका निर्णयावरून थेट सवाल केला.
गुरुवारी झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर लंच पूर्वी तासभर आधी ठाकरे गटाचे दुसरे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मोठे विधान केले. तुम्ही राजीनामा दिल्याने अधिकार गमावला आहे. तुमच्या विरोधात ३९ आमदारांनी कुठेही मतदान केले नाही. तुम्ही बहुमत चाचणीला पुढे गेला नाही. आम्ही काय करावे?, असा सवाल सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केला.
आम्ही परिस्थिती जैसे थे कशी करणार? सरन्यायाधीशांचा सवाल
तुम्ही बहुमत चाचणीला सामोरे गेला नाही. तुम्ही बहुमत चाचणीला सामोरे गेला असता आणि ३९ आमदारांनी विरोधात मतदान केल्याने हरला असता तर आम्ही ती बहुममत चाचणी रद्द केली असती. पण तुम्ही राजीनामा दिल्याने अधिकार गमावला. आम्ही परिस्थिती जैसे थे कशी करणार?, असा सवाल सरन्यायाधीशांनी केला. तर जे झाले ते आता आम्ही बदलू शकत नाही, असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी केला.
दरम्यान, अभिषेक मनु सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाच्या निकालात बऱ्याच ठिकाणी फुटीचा उल्लेख आहे. राज्यपालांनी अशावेळी नितिमत्ता पाहायला हवी. आकडेवारी नाही. अविश्वास ठराव सहा महिन्यात एकदा आणता येतो, असे सांगतानाच सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकरणात हस्तक्षेप करावा की नाही यावर माझा युक्तिवाद असेल असे सिंघवी म्हणाले. राज्यपालांचेही राजकीय संबंध असतात. अविश्वास प्रस्तावानंतरच राज्यपालांची भूमिका येते. पण या प्रकरणात राज्यपालांनी संविधानाची पायमल्ली केली आहे, असा दावा त्यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"