CJI DY Chandrachud: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर अनेक महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी सुरू आहे. नुकतेच आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून दिरंगाई होत असल्याप्रकरणी सीजेआय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांच्या प्रक्रियेवर नाराजी व्यक्त करत, तीव्र शब्दांत ताशेरे ओढल्याचे पाहायला मिळाले. यातच एका व्यक्तीच्या कोर्टातील वर्तणुकीवरून यापूर्वी चंद्रचूड यांनी संताप व्यक्त केला आहे. एका व्यक्तीने कोर्टरुम सुरू असताना फोन केल्याने चंद्रचूड यांनी संताप व्यक्त करत, हे काय मार्केट आहे का, अशी विचारणा केली.
सर्वोच्च न्यायालयात कोर्ट नंबर १ मध्ये मोबाईल फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीवर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड संतापल्याचा प्रकार समोर आला आहे. न्यायालयाचे कामकाज सुरू असताना एक व्यक्ती फोन वर बोलत होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर चंद्रचूड यांनी हे काय मार्केट आहे का? तुम्ही फोन वर बोलता, यांचा मोबाइल काढून घ्या आणि फोन जमा करा, असे निर्देश दिल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाही तर इथून पुढे न्यायालयात काळजी घ्या, या शब्दांत चंद्रचूड यांनी सुनावले.
न्यायाधीशांचे कोर्टात सगळीकडे लक्ष असते
कोर्टरुमध्ये काय काय सुरू असते, याकडे न्यायाधीशांचे लक्ष असते. आम्ही फक्त कागदपत्रे पाहण्याचे काम करत नाही. कागदपत्रे किंवा फाइल्स पाहत असतानाही कोर्टात घडणाऱ्या गोष्टींवर बारीक लक्ष असते, असे चंद्रचूड यांनी सुनावले. न्यायालयात कसे वागावे याबद्दल काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक असते. न्यायालयाचे कामकाज सुरू असताना त्यामध्ये अडथळा येईल, असे वर्तन केल्यास न्यायाधीश त्याबद्दल योग्य त्या सूचना देतात. तसेच न्यायालयात असभ्य वर्तन केल्यास न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल दंड होऊ शकतो.
दरम्यान, यापूर्वीही अनेकदा वकिलांकडून होणाऱ्या गैरवर्तनाबाबत किंवा चुकीच्या युक्तिवादाबाबत चंद्रचूड यांनी लगेचच वकिलांना सुनावल्याचे पाहायला मिळाले आहे.