Supreme Court CJI DY Chandrachud: आताच्या घडीला तंत्रज्ञान दिवसेंदिवस प्रगत होत जाताना दिसत आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच AI चे प्रस्थ जगभरात वाढताना दिसत आहे. दैनंदिन वापरातील स्मार्टफोन्समध्ये हे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जात आहे. एवढेच नव्हे, तर याची व्याप्तीही वाढताना दिसत आहे. याच एआय तंत्रज्ञानाचा वापर करून एक AI Lawyer तयार करण्यात आला आहे. खुद्द सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी या AI Lawyer ला एक प्रश्न विचारला.
एआय तंत्रज्ञानाने भारतात पाय रोवायला सुरुवात केल्यानंतर त्याचा झपाट्याने प्रसार झालेला आपल्याला दिसला. याचाच एक अनुभव भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी घेतला. सर्वोच्च न्यायालयातील राष्ट्रीय न्यायिक संग्रहालय आणि अभिलेखागार दालनाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी AI Lawyer बनवण्यात आला आहे. थेट सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी या AI Lawyer ची परीक्षा घेत संविधानाशी संबंधित एक कायदेशीर प्रश्न विचारला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे सांगितले जात आहे.
सरन्यायाधीशांचा प्रश्न आणि AI Lawyer चे उत्तर
AI Lawyer समोर आल्यावर त्याची परीक्षा घेण्यात आली. तो बरोबर उत्तर देतो का, हे तपासण्यात आले. भारतात मृत्यूदंड घटनात्मक आहे का, असा प्रश्न सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला. यावर तत्काळ AI Lawyer ने उत्तर दिले. हो. भारतात मृत्यूदंड घटनात्मक आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्धारित केल्यानुसार दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणांसाठी हे राखीव आहे जेथे गुन्हा अपवादात्मकरीत्या गंभीर आहे आणि अशा शिक्षेची हमी आहे, असे उत्तर AI Lawyer ने दिले.
दरम्यान, नवीन संग्रहालय सर्वोच्च न्यायालयाचे राष्ट्रासाठी महत्त्व दर्शवते. हे संग्रहालय तरुण पिढीसाठी संवादाची जागा बनले पाहिजे. शाळा आणि महाविद्यालयातील तरुण मुले, जे नागरिक वकील आणि न्यायाधीश नाहीत, त्यांनी येथे यावे आणि आम्ही कशाप्रकारे काम करतो, याची माहिती घ्यावी. जे काम सर्व न्यायाधीश आणि वकील करतात, त्याचा अनुभव त्यांना मिळेल आणि कायद्याच्या राज्याचे महत्त्व पटेल, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी नमूद केले. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आता निवृत्त होणार आहेत.