CJI DY Chandrachud: जर तुम्हाला न्यायाधीश व्हायचे असेल तर तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावे लागेल. तंत्रज्ञान शिकावेच लागेल. त्याला आता पर्याय नाही. तंत्रज्ञानाचा वापर न्यायाधीशांच्या प्राधान्यांवर अवलंबून नाही, असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी मुंबई उच्च न्यायालयासंदर्भात व्यक्त करत खडसावले.
उच्च न्यायालयात 'हायब्रिड' सुनावणी सुनिश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अनेक निर्देश जारी केले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व्हर्चुअल सुनावणी किंवा हायब्रीड पद्धतीने सुनावणी घेत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करताना, CJI चंद्रचूड म्हणाले की, जर तुम्हाला न्यायाधीश बनायचे असेल तर तुम्हाला तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावेच लागेल.
तंत्रज्ञानाचा वापर करण्यात मुंबई उच्च न्यायालय इतके उदासीन का आहे?
मुंबई उच्च न्यायालयात पायाभूत सुविधांचा भंग केला आहे. उच्च न्यायालयात काम केले आहे. मला सांगताना दुःख होत आहे की हायब्रीड पद्धत काढून टाकली गेली आहे. किती स्क्रीन काढल्या आहेत? न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या व्यतिरिक्त किती न्यायालयांमध्ये हायब्रीड सुनावणी आहे?, अशी विचारणा करत, भारतातील प्रत्येक न्यायाधीशाला तंत्रज्ञानाच्या बरोबरीने राहावे लागेल, असे चंद्रचूड यांनी स्पष्ट केले. तसेच न्यायाधीश हे तंत्रस्नेही आहेत की नाही हा प्रश्न नाही. तुम्हाला न्यायाधीश व्हायचे असेल तर तुम्हाला टेक्नो फ्रेंडली व्हायला हवे. तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. प्रत्येक न्यायाधीश प्रशिक्षित असणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनाही प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, तर उच्च न्यायालय या प्रकरणात इतके उदासीन का आहे, असा थेट सवाल चंद्रचूड यांनी केला.
दरम्यान, तंत्रज्ञान आता निवडीचा विषय नाही आणि ते कायद्याच्या पुस्तकांइतकेच महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञानाशिवाय न्यायालय कसे चालेल, अशी विचारणाही चंद्रचूड यांनी केली. महाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉ. वीरेंद्र सराफ यांना उद्देशून सरन्यायाधीश म्हणाले की, एका वकिलाने सांगितले की मुंबई उच्च न्यायालयात तंत्रज्ञान जवळपास संपुष्टात आणले जात आहे. यावर, सराफ म्हणाले की, विनंती केल्यास न्यायाधीश व्हर्जुअल सुनावणीस परवानगी देतात. या उत्तरावर, इतर न्यायाधीश तंत्रज्ञान का स्वीकारत नाहीत? यात आक्षेप काय आहे? मुंबईसारख्या शहरात प्रवास करणे खूप कठीण आहे. एक वकील म्हणून मला उच्च न्यायालयातून शहर दिवाणी न्यायालयात पोहोचण्यासाठी खूप धावपळ करावी लागेल, असे चंद्रचूड यांनी म्हटले आहे.