CJI DY Chandrachud: महाराष्ट्राचा राजकीय संघर्ष, आमदार अपात्रता, मणिपूर हिंसाचार यांसह अनेक महत्त्वाच्या याचिकांवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठांसमोर सुनावणी सुरू आहे. सडेतोड विधाने आणि स्पष्ट भूमिकेमुळे चंद्रचडू यांची एक वेगळी प्रतिमा देशासमोर आहे. यातच सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आपल्या धार्मिक विचारांबाबत स्पष्ट शब्दांत मते मांडली असून, संविधानानुसार काम करतो, असे म्हटले आहे.
एका मुलाखतीत चंद्रचूड यांना अध्यात्म आणि धार्मिक विचारांबाबत प्रश्न विचारण्यात आला. एखाद्या देवावर विशेष आस्था ठेवता का, असे चंद्रचूड यांना विचारण्यात आले. यावर बोलताना, अर्थात, जेव्हा मी प्रार्थना करतो, तेव्हा मला एक शाश्वत परमात्मा जाणवतो जो विश्वाची व्यवस्था आणि मनुष्याचे नशीब नियंत्रित करतो. आमची कुलदेवता आहे आणि देवघराची वेगळी खोली आहे, असे चंद्रचूड यांनी उत्तर देताना सांगितले. पण मी माझी धार्मिक श्रद्धा आणि विचार कोणावरही लादत नाही. ते माझ्यासाठी खूप वैयक्तिक आहेत. माझ्या कुटुंबाने त्यांच्या धार्मिक श्रद्धा आणि विचार माझ्यावर थोपवले नाहीत आणि मी माझ्या श्रद्धा कोणावर थोपवत नाही, असे चंद्रचूड यांनी नमूद केले.
संविधानाच्या मूल्यांसाठी समर्पित भावनेने काम करतो
संविधान आणि संविधानातील मूल्यांना समर्पित भावनेने मी माझे काम करतो. जेव्हा मी न्यायाधीश म्हणून काम करतो तेव्हा मी संविधानाच्या मूल्यांची अंमलबजावणी करण्यासाठी वचनबद्ध आहे. माझ्या जवळच्या कुटुंबातील कोणावरही अध्यात्माविषयीच्या माझ्या कल्पना लादत नाही. उदाहरण द्यायचे झाले तर, माझ्या पत्नीला पर्वत, नद्या, झाडे आणि पक्ष्यांच्या सौंदर्यात परमात्म्याचे प्रतिबिंब दिसते. ती अशीच व्यक्ती आहे, असे धनंजय चंद्रचूड यांनी सांगितले.
दरम्यान, सरन्यायाधीश चंद्रचूड हे धार्मिक तसेच अतिशय आध्यात्मिक आहेत. वडिलांकडून अध्यात्माचा वारसा मिळाला आहे. चंद्रचूड कधीही पूजा केल्याशिवाय घराबाहेर पडत नाही, असे सांगितले जाते. असे केल्याने केवळ आत्मिक शक्ती आणि शांती मिळत नाही, उलट त्याचा फायदा त्यांना दररोजच्या कामात मिळतो, असा विश्वास चंद्रचूड यांना वाटतो.