Supre Court CJI DY Chandrchud: गेली २४ वर्षे न्यायदान, न्यायनिवाडा करण्याचे काम करत आहे. आतापर्यंत कधीही न्यायालयाचे काम अर्धवट सोडून बाहेर पडलो नाही. मात्र, एका छोट्याश्या कारणारवरून ट्रोल करण्यात आले. माझे वागणे अहंकारी असल्याचे काहीजणांनी म्हटले. मला विश्वास आहे की, आम्ही न्यायाधीश म्हणून जे काम करत आहोत, त्यावर जनसामान्यांचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाला सार्थ ठरविण्याचे काम आपल्याला करत राहायचे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
सोशल मीडियामुळे अनेक गोष्टी कमी वेळात जगभरात पोहोचतात. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत न्यायालयेही आधुनिक बनली आहेत. ऑनलाइन जगतात सोशल मीडियावरट्रोलिंग करणे, हा प्रकार आता नवीन राहिलेला नाही. कुणीही मोठा व्यक्ती ट्रोलिंगला बळी पडतो. हे ट्रोलिंग कोणत्याही कारणावरून असू शकते. डीवाय चंद्रचूड यांनाही ट्रोलिंगला बळी पडावे लागले आहे. अनेकदा न्यायालयाच्या कामकाजाचेही लाइव्ह स्ट्रिमिंग केले जाते. हे कामकाज हजारो लोक पाहत असतात. अशाच एका सुनावणीच्या लाइव्ह स्ट्रिमिंगनंतर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. ट्रोलर्सनी डीवाय चंद्रचूड यांच्यावर टीका केली. बोल लावले. या ट्रोलिंगमुळे चंद्रचूड व्यथित झाले आणि नेमकी घटना काय घडली, ते सांगताना ट्रोलर्सना चांगलेच खडेबोल सुनावले.
डीवाय चंद्रचूड यांनी ट्रोलर्सना चांगलेच सुनावले
बंगळुरू येथे न्यायिक अधिकाऱ्यांच्या एका राज्यस्तरीय परिषदेत बोलत असताना चंद्रचूड यांनी हा प्रसंग सांगितले. काम आणि वैयक्तिक आयुष्याची सांगड घालत असताना तणावाचे व्यवस्थापन कसे करावे? याबाबत मत व्यक्त केले. डीवाय चंद्रचूड म्हणाले की, चार ते पाच दिवसांपूर्वीच हा प्रसंग घडलेला आहे. खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती. माझी कंबर थोडी भरून आल्यामुळे थोडा सावरून बसलो. खुर्चीवर माझ्या बसण्याची स्थिती बदलली. या छोट्याश्या कारणावरून मला ट्रोल केले गेले.
सुनावणी सुरू असताना उठून गेलो, असे चित्र निर्माण केले
यावरून सोशल मीडियावर अनेकांनी उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या. सरन्यायाधीशांचे वागणे अहंकारी असल्याचे काहीजण म्हणाले. सुनावणी सुरू असताना माझी बसण्याची स्थिती बदलू कशी शकते, असा आक्षेपही अनेक ट्रोलर्सनी घेतला. परंतु, ट्रोलर्स हे कधीच सांगणार नाहीत की, फक्त बसल्या जागी माझी स्थिती बदलली. सुनावणी सुरू असताना उठून गेलो, असे चित्र निर्माण केले गेले. फक्त बसल्याजागी बसायची पद्धत बदलली तर ट्रोल केले. असभ्य भाषेचा वापर केला, या शब्दांत चंद्रचूड यांनी आपली व्यथा मांडली.
दरम्यान, काम आणि वैयक्तिक जीवनात समतोल तसेच संतुलन निर्माण करणे हे न्यायदानाच्या कामाशीच निगडीत आहे. समोरच्यांना सुधारण्याऐवजी आपण स्वतःमध्ये आणखी कशी सुधारणा घडवून आणू शकतो, याकडे लक्ष द्यायला हवे. न्यायालयात संवाद साधताना कधी वकील आणि वादी मर्यादांचे उल्लंघन करतात. अशावेळी न्यायालयाची अवहेलना न समजता त्यांनी मर्यादेचे उल्लंघन का केले? हे मोठ्या मनाने समजून घेतले पाहिजे, असे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी नमूद केले.