सरन्यायाधीश एनव्ही रमणा (NV Ramana) यांनी पुन्हा एकदा भारतातील न्यायाधीशांच्या प्रतिमेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सरकारं न्यायाधीशांची प्रतिमा मलिन करत असल्याचं मोठं वक्तव्य करत त्यांनी हे दुर्दैवी असल्याचं म्हटलं. छत्तीसगडचे माजी प्रधान सचिव अमन सिंग आणि त्यांची पत्नी यास्मिन सिंग यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या घोषित उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता मिळाल्याबद्दल सुनावणी सुरू होती.
हे प्रकरण उचित शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलं आहे, यामध्ये राज्याचे माजी प्रधान सचिव आणि त्यांच्या पत्नीच्या बेनामी तसंच इतर मालमत्तेची माहिती देणाऱ्या व्हिसलब्लोअरविरुद्धच एफआयआर नोंदवून कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी राज्य सरकारने स्वतंत्र अपीलही दाखल केलं आहे. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी सरकारांच्या प्रवृत्तीवर भाष्य केले. "आजकाल सरकारं न्यायाधीशांची प्रतिमा मलिन करत आहेत आणि ही दुर्दैवी परिस्थिती आहे," असं सरन्यायधीश रमणा म्हणाले.
दरम्यान या प्रकरणी सुनावणी आता १८ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली. सरकार आणि त्यांच्या अधिकार्यांवर ताशेरे ओढताना सरन्यायाधीश म्हणाले की, "पूर्वी केवळ खाजगी संस्था किंवा पक्ष न्यायालयात न्यायाधीशांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असत. पण आता सरकारे हे करू लागले आहेत," ही परिस्थिती अधिक दुर्दैवी असल्याचंही त्यांनी सांगितलं.