- खुशालचंद बाहेतीनवी दिल्ली : विप्रोचे माजी चेअरमन अझीम प्रेमजी यांनी त्यांच्यावर ७० पेक्षा जास्त खोटी प्रकरणे न्यायालयात दाखल करणाऱ्यास माफ केले. त्यांच्या या ‘रचनात्मक दृष्टिकोनाचे’ सुप्रीम कोर्टाने कौतुक केले आहे. सुब्रमण्यन यांच्या ‘इंडिया अवेक फॉर ट्रान्सपरन्सी’ या खासगी कंपनीने बंगळुरू दंडाधिकाऱ्यांसमोर एक फौजदारी तक्रार दाखल केली होती. यात प्रेमजींच्या ट्रस्टला त्यांच्या खासगी कंपन्यांमधून शेअर्स, मालमत्ता बेकायदेशीरपणे हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोप होता. डिसेंबर २०२० मध्ये सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी प्रेमजीविरुद्धच्या कारवाईला स्थगिती दिली होती.
दोन महिन्यांपूर्वी, कर्नाटक उच्च न्यायालयाने सुब्रमण्यन यांनी अझीम प्रेमजी, त्यांचे कुटुंबीय व त्यांच्याशी संबंधित उद्योगाविरुद्ध एकाच कारणावरून अनेक फालतू खटले दाखल केले आणि कोर्टाच्या वेळेचा अपव्यय केला म्हणून न्यायालयाच्या अवमानासाठी दोषी ठरवले आहे. प्रेमजींच्या कंपनीने दाखल केलेल्या चेक बाउन्स प्रकरणातही त्याला दोषी ठरवण्यात आले होते.सुप्रीम कोर्टामध्ये प्रेमजींच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाने सुब्रमण्यन यांना माजी विप्रो अध्यक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांची बिनशर्त माफी मागावी, असे सुचवले होते.