Diwali 2023: दिवाळीची धूम देशभरात पाहायला मिळाली. दीपोत्सव दणक्यात साजरा करण्यात आला. देशभरात फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. दिल्लीसह देशातील अनेक शहरांतील हवेच्या प्रदुषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. याबाबत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर फटाके वाजवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिले होते. मात्र, हे निर्देश फटाक्यांच्या धुरात विरल्याचे चित्र दिसत आहे. देशवासीयांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केल्याचे सांगितले जात आहे.
दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणामुळे सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी घातली होती. मात्र त्यानंतरही दिवाळीत अनेक भागात फटाके फोडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. पर्यावरणवादी भवरीन कंधारी यांनी याबाबत बोलताना सांगितले की, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाके वाजवले जात होते. यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. फटाक्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर भूमिकेचे पालन करण्यात आलेले नाही. इशारा आणि निर्बंध देण्यात आलेले असतानाही त्याची अंमलबजावणी करण्यात अधिकारी पुन्हा एकदा अपयशी ठरले आहेत. आता सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. उत्सवाच्या नावाखाली आपण आपल्या मुलांना प्रदुषित जीवन जगण्यास भाग पाडत आहोत, अशी टीका कंधारी यांनी यावेळी केली.
नागरिकांनी हे नियम सर्रास धाब्यावर बसविल्याचे सर्वत्र अनुभवायला आले
दुसरीकडे, मुंबई महानगर प्रदेशात हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने फटाके वाजवण्यासाठी केवळ रात्री ८ ते १० परवानगी दिली होती. मात्र नागरिकांनी हे नियम सर्रास धाब्यावर बसविल्याचे सर्वत्र अनुभवायला आले. रात्री १० नंतरही फटाक्यांचा धूमधडाका सुरूच होता. अगदी पहाटेपासूनच काही भागांमध्ये मोठ्या आवाजाचे आणि धुराचे फटाके फोडले गेले. रविवारी पहाटेपासूनच मोकळी मैदाने, इमारतींच्या गच्च्या येथे फटाक्यांच्या जोरदार आतषबाजी सुरू झाली. परिणामी हवेचा दर्जा पुन्हा खालावला. शहरातील बहुतेक भागांत धुराचे साम्राज्य पसरल्याचे बघायला मिळाले.
दरम्यान, काही संवेदनशील ठिकाणांवर फटाके वाजवण्यास पोलीस लोकांना मज्जाव करीत होते. न्यायालयाने लागू केलेले वेळेचे निर्बंध पाळले जावेत म्हणून पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. मात्र गल्ली-बोळात किंवा सोसायट्यांमध्ये अगदी पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत फटाके उडवले जात असताना या सर्वाना अडविण्यास पोलिसांची यंत्रणा अपुरीच ठरली.