नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. पी चिदंबरम यांनी दिल्ली उच्च न्यायालयाकडून नाकारण्यात आलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच निर्णयाला आव्हान दिलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
'प्राथमिक स्तरावर अटकपूर्व जामीन देणे तपासात अडथळा आणू शकतं. अटकपूर्व जामीन देण्यास मान्यता देण्यासाठी हे योग्य प्रकरण नाही. आर्थिक गुन्हे गंभीर असून त्यांना वेगळ्या पद्धतीने हाताळण्याची गरज आहे' असं सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावताना म्हटलं आहे. तसेच ट्रायल कोर्टात नियमित जामिनासाठी अर्ज करू शकता असं सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांना सांगितलं आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणी सीबीआय तपास करत आहेत.
तीन दिवसांची रिमांड संपल्यानंतर चिदंबरम यांना सीबीआयने न्यायालयासमोर हजर केले होते. यावेळी त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी चिदंबरम यांच्या जामीनासाठी न्यायालयासमोर अर्ज दाखल केला. सीबीआयने यावर उत्तर देण्यासाठी वेळ मागितला होता. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला कायद्यापुढे सगळे समान आहेत आणि जर असा अर्ज दाखल केला जात असेल तर त्याची माहिती संबंधित यंत्रणेला देणं गरजेचं असल्याने या अर्जावर निर्णय घेण्यासाठी वेळ देण्यात यावा असं सांगितलं होतं. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करत चिदंबरम यांच्या जामीन अर्जावरून सुनावणी मंगळवारी ठेवली होती. मात्र, आता ही सुनावणी गुरुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.
कोट्यवधीमध्ये आहे चिदंबरम यांची वार्षिक कमाई, एकूण संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
चिदंबरम यांच्या अटकेनंतर त्यांच्या संपत्तीबाबत चर्चा सुरू झाली आहे. चिदंबरम यांच्या कुटुंबियांनी घोषित केल्याप्रमाणे ते जवळपास 175 कोटी रूपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. मात्र तपास यंत्रणांनी त्यांची संपत्ती ही घोषित करण्यात आलेल्या संपत्तीच्या कित्येक पटीने जास्त असल्याचा आरोप केला आहे. चिदंबरम आणि त्यांच्या पत्नीकडे तब्बल 95.66 कोटींची संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास 5 कोटी रूपयांचं कर्ज असल्याचं चिदंबरम यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे. केवळ देशातच नाही तर परदेशातही त्यांची कोट्यवधींची संपत्ती आहे. तसेच चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांच्याकडेही 80 कोटी रूपयांची संपत्ती असल्याचं त्यांनी घोषित केलं आहे. 2014-2015 त्यांनी पत्नी आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न 9.75 कोटी असल्याचं सांगितलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.