नवी दिल्ली- दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या 'पद्मावती' या सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. 'सिनेमाच्या प्रदर्शनाचा निर्णय सेन्सॉर बोर्डाला स्वतंत्रपणे घेऊ द्या,' असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सामाजिक संघटना तसंच राजकीय नेत्यांच्या विरोधाचा सामना करावा लागलेल्या दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना या निर्णयामुळं मोठा दिलासा मिळाला आहे.
सिनेमामध्ये ऐतिहासिक कथा चुकीच्या पद्धतीने मांडल्याचा कथित आरोपांवरून 'पद्मावती' सिनेमाला देशभरात विरोध होत आहे. या सिनेमातून राणी पद्मिनीची मानहानी करण्यात आली आहे, असा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे. राजपूत समुदायाने या सिनेमाला आक्षेप घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती. पण, कोर्टाने या संदर्भातील याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला. 'सेन्सॉर बोर्ड आणि चित्रपट लवादाच्या अधिकारात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही,' असं खंडपीठानं स्पष्ट केलं.
पद्मावती या सिनेमाला देशभरातून विरोध होतो आहे. राजपूत समुदायासह अनेक सामाजिक संघटना तसंच राजकीय नेते सिनेमाला विरोध करत आहेत. सिनेमा प्रदर्शनापूर्वी आम्हाला दाखवा, अशी मागणीही राजपूत समुदायाकडून केली जाते आहे. येत्या 1 डिसेंबर रोजी पद्मावती सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.