नवी दिल्ली : भाजप आणि काँग्रेससह नऊ राजकीय पक्षांवर उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लोकांपुढे न मांडल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका ठेवला आहे. याबाबत आठ पक्षांवर सुप्रीम कोर्टाने दंडही आकारला आहे. यापुढे उमेदवारांची माहिती ४८ तासांत लोकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्याचा दंडक कोर्टाने पक्षांना घालून दिला आहे. अवमान केल्याप्रकरणी कोर्टाने काँग्रेस, भाजपसह पाच पक्षांना प्रत्येकी एक लाख तर सीपीएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रत्येकी पाच लाखांचा दंड ठोठावला आहे. पुन्हा पुन्हा आवाहन केल्यानंतरही पक्ष गाढ झोपेतून जागे होण्यास तयार नव्हते. राजकारणाला गुन्हेगारीचे लागलेला कलंक पुसून काढण्यासाठी कायदे बनविणाऱ्यांना आता कठोर पाऊले उचलावी लागणार आहेत, असे सुप्रीम कोर्टाने निर्देशात म्हटले आहे. या आदेशामुळे राजकारण गुन्हेगारीमुक्त होण्यास मोठी मदत मिळणार आहे, असे मत देशातील ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. उमेदवारांची माहिती लोकांपर्यंत पोहाचावी यासाठी निवडणूक आयोगाने एक ॲप तयार करावे, अशी सूचना कोर्टाने केली.
काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; दंड भरावा लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 6:29 AM