नवी दिल्ली - चित्रपटातील गाण्यावरुन अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर विरोधात सुरु झालेल्या गुन्हेगारी प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. ओरू अडार लव्ह या प्रियाच्या मल्याळम चित्रपटातील गाण्यावर काही मुस्लिम संघटनांनी आक्षेप घेतला आहे. या गाण्यामुळे भावना दुखावत असल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे. प्रियाने दाखल केलेल्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले होते.
निर्माता आणि आपल्याविरोधातील एफआयआर रद्द करावी अशी मागणी तिने याचिकेतून केली आहे. या गाण्यामुळे धार्मिक भावना दुखावत असल्याचे काही मुस्लिमांचे म्हणणे आहे. अवघ्या काही सेकंदांच्या व्हिडिओमुळे नॅशनल क्रश बनलेल्या प्रियाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. ओरू अडार लव्ह चित्रपटातील 'मानिका मलयारा पूवी' या गाण्यातील प्रियाच्या अदांनी तरुणाईला अक्षरक्ष वेड लावले आहे. अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडिओमुळे ती नॅशनल क्रश बनली. अजूनही या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झालेले नाही.
हैदराबादमधील काही तरूणांनी गाण्यातील शब्दांवर आक्षेप नोंदविला आहे. गाण्यावर आक्षेप घेत फलकनुमा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 'आम्हीदेखील या गाण्याचे आणि प्रियाचे चाहते झालो होतो. पण, हे गाणं मल्ल्याळम भाषेत असल्याने आम्ही त्याचा अर्थ इंटरनेटवर शोधला. त्यानंतर आमच्या लक्षात आलं की या गाण्यात असे काही शब्द आहेत, ज्यामुळे आमच्या धर्माचा अपमान होतो. गाण्यातील शब्दांमुळे धार्मिक भावना दुखावल्यानं त्यांनी चित्रपट निर्माते आणि अभिनेत्री प्रिया प्रकाशविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रिया प्रकाश स्टारर 'ओरू अडार लव' हा सिनेमा 3 मार्च रोजी प्रदर्शित होतो आहे.