बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला मंगळवारी सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. त्याला वैद्यकीय आधारावर अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, या कालावधीत त्यांना जामीनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. जामीनादरम्यान आसाराम त्याच्या कोणत्याही अनुयायाला भेटू शकणार नाही. त्याला 31 मार्चपर्यंत तुरुंगातून बाहेर येण्याची परवानगी देण्यात आली आहे.
बलात्कार प्रकरणातील दोषी आसाराम याला जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून 'भगत की कोठी' येथील आरोग्य सेवा केंद्रात दाखल करण्यात आले आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आसाराम हृदयरोगी असून त्याला हृदयविकाराचा झटकाही आला आहे. सुप्रिम कोर्टाने वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर करतानाच, पोलिस तैनात करण्याचेही आदेश दिले आहेत.
आसाराम बापूला 2 प्रकरणांत शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जोधपूर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या खटल्यानुसार, आसारामला जोधपूर पोलिसांनी 2013 साली इंदूर येथील आश्रमातून अटक केली होती. तेव्हापासून आसाराम तुरुंगात आहे. पाच वर्षांच्या प्रदीर्घ खटल्यानंतर 25 एप्रिल 2018 रोजी न्यायालयाने आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
याशिवाय, दुसरे प्रकरण गुजरातच्या गांधीनगर न्यायालयाचे आहे. गुजरातमधील गांधीनगर येथील आश्रमातील एका महिलेने आसारामवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. 31 जानेवारी 2023 रोजी न्यायालयाने आसारामला या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.