नवी दिल्ली: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग Param Bir Singh गेल्या ९ महिन्यांपासून बेपत्ता आहेत. त्यांचा ठावठिकाणा अद्याप समजू शकलेला नाही. परमबीर सिंग यांना अटकेपासून संरक्षण देण्याची याचिका त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. सिंग नेमके कुठे आहेत, असा सवाल न्यायमूर्तींनी गेल्या आठवड्यात सुनावणी दरम्यान उपस्थित केला. त्याला सिंग यांच्या वकिलांनी आज उत्तर दिलं.
परमबीर सिंग भारतातच आहेत. ते देश सोडून गेलेले नाहीत. सर्वोच्च न्यायालयानं त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यास ते पुढील ४८ तासांत सीबीआयच्या कार्यालयात अथवा कोर्टात हजर होतील, असं सिंग यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं त्यांना अटकेपासून दिलासा दिला. परमबीर यांनी तपासाला सहकार्य करावं, असे आदेश न्यायमूर्तींनी दिले.
सर्वोच्च न्यायालयानं परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली. यासोबत न्यायालयानं ठाकरे सरकार आणि सीबीआयला नोटिसदेखील बजावली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ डिसेंबरला होईल. सर्वोच्च न्यायालयानं परमबीर यांना अटकेपासून संरक्षण दिल्यानं आता ते सर्वांसमोर येण्याची शक्यता वाढली आहे. मार्चपासून परमबीर सिंग बेपत्ता आहेत. ते देशाबाहेर पळून गेल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होती.