ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 26 - बँकांचे जवळपास 9000 कोटी रुपयांचे कर्ज बूडवून पसार झालेल्या विजय मल्ल्यांच्या परदेशातील संपत्तीची माहिती सर्वोच्च न्यायालयाने बँकांना दिली आहे. विजय मल्ल्या यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबियांची संपत्तीची माहितीदेखील देण्यात आली आहे. मल्या यांनी आपल्या आणि कुटुंबियांच्या नावे असलेल्या परदेशातील संपत्तीची माहिती एका बंद पाकिटात न्यायालयात दिलेली होती. संपत्तीच्या माहितीच्या आधारे बँकांनी काय कारवाई केली याची माहिती दोन महिन्यात देण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायलयाने दिले आहेत.
विजय मल्ल्या भारतात येण्यास तसंच न्यायालयासमोर स्वत:हून हजर होण्यास इच्छुक नसल्याचं म्हणत न्यायालयाने फटकारलं आहे. संपत्ती जाहीर झाल्यानंतर बँका कायद्याप्रमाणे कारवाई करतील असंही न्यायालयाने सांगितलं आहे. विजय मल्ल्या फरार आहेत, त्यांनी न्यायालयात यावे. तसंच संपत्तीची माहिती दिल्यास समझोता करण्यास प्रोत्साहन मिळेल अशी बाजू बँकांनी न्यायालयात मांडली आहे.
विजय मल्ल्या यांच्याकडून फक्त कर्जवसुली न करता त्यांना कारागृहात पाहणे बँकांचा उद्देश असल्याचा दावा मल्ल्यांच्या वकिलांने केला आहे. मुद्दामून अशी परिस्थिती उभी केली जात आहे. अशा परिस्थितीत भारतात परत येणं मल्ल्यांसाठी कठीण असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. विजय मल्ल्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन करण्यात अयशस्वी ठरलेत, त्यामुळे केंद्र सरकार कायद्यानुसार पावले उचलणार आहे अशी माहिती अॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी न्यायालयात दिली आहे.
दरम्यान विजय मल्ल्या यांनी 6868 कोटी भरण्यास तयार असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयात दिली होती. याअगोदर मल्ल्या यांनी सप्टेंबरपर्यंत ४००० करोड भरण्याचा ठेवलेला प्रस्ताव बँकांसमोर ठेवला होता. मात्र बँकांनी हा प्रस्ताव नाकारल्यानंतर विजय मल्ल्या यांनी अजून 2468 भरण्याची तयारी दर्शवली होती.
मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकेसह 17 बँकांनी कर्ज दिले होते. स्टेट बँक या सर्व बँकांचे नेतृत्व करत आहे. सर्व बँकांचे मिळून तब्बल 9000 करोड रुपये किंगफिशर एअरलाईन्सने थकवले आहेत. 2 मार्चला विजय मल्ल्या दुपारी 1.30 वाजता जेट एअरवेजच्या दिल्ली - लंडन ‘9W 122’ विमानाने रवाना झाले होते. विजय मल्ल्या यांना देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती मात्र विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती.