ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - 900 कोटी रुपयांच्या चारा घोटाळयात राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि अऩ्य आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी जोरदार झटका दिला. प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्र सुनावणी घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. लालू प्रसाद यादव यांच्यावरील गुन्हेगारी कारस्थान रचल्याच्या आरोपाची पुन्हा सुनावणी होणार आहे.
संपूर्ण चारा घोटाळा प्रकरण एकच आहे. त्यामुळे लालूंविरोधात प्रत्येक प्रकरणाची वेगळी सुनावणी घेऊ नये असा आदेश देताना झारखंड उच्च न्यायालयाने त्यांच्यावरील कारस्थान रचल्याचा आरोप रद्द केला होता. या निर्णयाला सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
20 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निकाल राखून ठेवला होता. लालूंनीही त्यांना सुनावण्यात आलेल्या तुरुंगवासाच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. 1990 ते 1997 दरम्यान लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना पशुसंवर्धन खात्याने बिहारच्या विविध जिल्ह्यात कोषागारातून कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढले होते.