नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविराेधात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर साेमवार, दि.११ जानेवारीला सुनावणी हाेणार आहे. त्यासाेबतच आंदाेलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवरून हटविण्यासाठीही काहींनी शपथपत्र दाखल केले हाेते.
केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा सुरू असल्यामुळे सुनावणी पुढे ठेवण्याची विनंती ॲटर्नी जनरल के. के. वेणुगाेपाल यांनी यापूर्वीच्या सुनावणीवेळी केली हाेती. चर्चेतून मार्ग निघण्याची अपेक्षा असून केंद्राने शपथपत्र सादर केल्यास वाटाघाटी फिसकटण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले हाेते. तर शेतकऱ्यांनी महामार्ग राेखून ठेवल्यामुळे लाखाे लाेकांना त्रास हाेत असून त्यांना महामार्गावरून हटवावे, अशी मागणी करणारे शपथपत्र रिषभ शर्मा या विधि विद्यार्थ्याने दाखल केले हाेते.