काही दिवसापूर्वी तिरुपती मंदिरातील लाडू बनवताना वापरल्या जाणाऱ्या तुपामध्ये प्राण्यांच्या चरबी वापरल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान, आता या प्रकरणी हस्तक्षेप करण्याच्या मागणी करणाऱ्या अनेक जनहित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार, न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर ३० सप्टेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
अधिवक्ता सत्यम सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेत, मंदिर चालवणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्टच्या गुन्हेगारी कट आणि गैरव्यवस्थापनाची सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून न्यायालयीन चौकशीची किंवा सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
याचिकेत म्हटले आहे की, तिरुमला येथील लाडू प्रसादममध्ये प्राण्यांची चरबी, माशांचे तेल आणि इतर मांसाहारी घटकांचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे.
हे कृत्य हिंदू धार्मिक प्रथांचे उल्लंघन तर आहेच, शिवाय असंख्य भाविकांच्या भावनाही दुखावल्या आहेत, असंही याचिकेत म्हटले आहे. तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादात प्राण्यांच्या चरबीची भेसळ करणे हे धर्मस्वातंत्र्याच्या अधिकाराची हमी देणाऱ्या घटनेच्या कलम २५ चे उल्लंघन आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी यापूर्वीच एसआयटी स्थापन केली आहे.
दुसरीकडे, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या दाव्यांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले, यात त्यांनी म्हटले होते की, वायएसआरसीपी सत्तेत असताना तिरुपती लाडू बनवण्यासाठी भेसळयुक्त तूप वापरण्यात आले होते. रविवारी, वायएसआरसीपी प्रमुख म्हणाले की, चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने नियुक्त केलेल्या टीटीडी कार्यकारी अधिकाऱ्याची विधाने फक्त मुख्यमंत्र्यांच्या दाव्यांचे खंडन करतात.
जगन मोहन यांनी मुख्यमंत्र्यांना ट्विटरवरील पोस्टमध्ये विचारले, "याचा अर्थ काय? हा पुरावा पुरेसा नाही का? सत्यमेव जयते."
जगन मोहन रेड्डी यांनी टीटीडी ईओ राव यांच्या २३ जुलैच्या विधानाचा हवाला दिला. राव म्हणाले होते की, टीटीडीला वनस्पतीमध्ये भेसळ असलेले तूप सापडले आणि दोन टँकर परत करण्यात आले. १८ सप्टेंबर रोजी सीएम नायडू यांनी लाडू बनवताना तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याचा आरोप केला होता.