नवी दिल्ली - जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ आणि अलिगड विद्यापीठात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकांबाबत मंगळवारी सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात तीन याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. आता मंगळवारी सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ मंगळवारी या प्रकरणी सुनावणी करणार आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते.
रविवारी दिल्लीतीत जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. दिल्लीत आंदोलकांनी बसगाड्या आणि दुचाकींना आग लावली होती. त्यानंतर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला होता. त्यानंतर पोलिसांनी समाजकंटक जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात लपल्याच्या संशयावरून कॉलेजचा आवार मोकळा केला होता.
दिल्लीतीत जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाप्रमाणेच अलिगडमधील अलिगड मुस्लिम विद्यापीठातही रविवारी रात्री झालेल्या आंदोलनात तीन विद्यार्थी जखमी झाले होते. त्यानंतर पोलिसांनी २१ विद्यार्थ्यांना अटक केली होती. तसेच अलिगड मुस्लिम विद्यापीठी ५ जानेवारीपर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते.