सर्वोच्च न्यायालयाने उद्योगपती विजय मल्ल्याला मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने त्याला अवमान केल्याप्रकरणी 4 महिन्यांची शिक्षा आणि 2000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड न भरल्यास मल्ल्याला दोन महिन्यांची अधिक शिक्षा भोगावी लागणार आहे. याशिवाय, न्यायालयाने मल्ल्याला परदेशात ट्रान्सफर केलेले 40 मिलियन डॉलर्स 4 आठवड्यांच्या आत जमा करण्याचे आदेशही दिले आहेत.सर्वोच्च न्यायालयात जस्टिस यू यू ललित, जस्टिस एस रविंद्र भट्ट आणि जस्टिस सुधांशू धुलिया यांच्या 3 सदस्यीय बेंचने हा निर्णय दिला आहे. भारतीय स्टेट बँकेनेविजय मल्ल्याविरोधात, न्यायालयाने आदेश देऊनही थकबाकी जमा न केल्याने अर्ज केला होता.
तत्पूर्वी, न्यायालयाने 10 मार्चला मल्ल्याच्या शिक्षेसंदर्भातील निर्णय सुरक्षित ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयाने 5 वर्षांपूर्वी 9 मे 2017 रोजी विजय मल्ल्याला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवत त्याच्या विरोधात अवमान केल्यासंदर्भात कार्यवाही सुरू केली होती. कारण, विजय मल्ल्याने ज्या बँकांकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांना आपल्या संपत्तीची संपूर्ण माहिती दिली नव्हती.
याप्रकरणी बँका आणि प्राधिकरणांची बाजू एकल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने 10 जुलै 2017 रोजी, विजय मल्ल्याने आपली बाजू मांडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात हजर व्हावे, असा आदेश दिला होता. यावेळी, मल्ल्या ब्रिटनमध्ये एका मुक्त व्यक्तीप्रमाणे राहत आहे. मात्र, तो तेथे काय करतो, यासंदर्भात कसल्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही, असे न्यायालयाने म्हटले होते.