नवी दिल्ली : सनातन धर्माविरोधात वादग्रस्त केल्यामुळे तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सनातन धर्मावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी उदयनिधी स्टॅलिन यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नोटीस बजावली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
सनातन धर्माच्याविरोधात असलेल्या उदयनिधी स्टॅलिन आणि ए राजा यांच्या वक्तव्याविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने ही नोटीस बजावली आहे. द्वेषपूर्ण भाषणाबाबत प्रलंबित असलेल्या इतर याचिकांसह या प्रकरणाची सुनावणी होईल, असे न्यायालयाचे म्हणणे आहे. दरम्यान, तामिळनाडूमध्ये सनातन धर्माविरोधात होणारे कार्यक्रम असंवैधानिक घोषित करण्यात यावेत, अशी मागणी करणारी याचिका चेन्नईच्या एका वकिलाने दाखल केली आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वी उदयनिधी स्टॅलिन यांनी पुन्हा एकदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नाव घेऊन सनातन धर्मावर टीका होती. तसेच, संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यावरुन उदयनिधी स्टॅलिन केंद्रातील मोदी सरकारवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आले नाही, कारण त्या आदिवासी समाजाचे आहेत आणि विधवा आहेत. हाच सनातन धर्म आहे का? असा सवाल करत त्यांनी सनातन धर्माच्या विरोधात आवाज उठवत राहू, असेही यावेळी भाष्य केले होते.
याआधीही सनातन धर्माविरोधात विधान?उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी (2 सप्टेंबर) चेन्नई येथे बोलताना सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली होती. उदयनिधी स्टॅलिन म्हणाले होते की, सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही. त्या संपवल्याच पाहिजे. जसे की, डासांमुळे डेंग्यू, कोरोना आणि मलेरियासारखे आजार होतात. त्यांचा आपण विरोध करू शकत नाही, त्यांचा नायनाट करावा लागतो. सनातन धर्मही तसाच आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते.