ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - याकूब मेमनची दया याचिका फेटाळणारे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश दीपक मिश्रा यांना निनावी पत्राव्दारे जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रानंतर दीपक मिश्रा यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टाच्या न्या. दीपक मिश्रा, पी सी पंत व अमितावा रॉय या त्रिसदस्यीय खंडपीठाने २९ जुलैरोजी याकूबची फेरविचार याचिका फेटाळून लावला होता. या निर्णयामुळे याकूब मेमनला दिलासा मिळण्याची आशा संपुष्टात आली होती. याकूब मेमनची याचिका फेटाळणा-या न्यायाधीशांवर हल्ला होऊ शकतो असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी यापूर्वीच दिला होता. दोन दिवसांपूर्वी मिश्रा यांना निनावी पत्राव्दारे धमकी दिल्याचे समोर आले आहे.
सुप्रीम कोर्टाचे न्या. ए आर दवे व कुरियन जोसेफ यांच्यात एकमत न झाल्याने याकूबची फेरविचार याचिका सुनावणीसाठी दीपक मिश्रा व अन्य दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ठेवण्यात आली होती.