नवी दिल्ली :
प्रजासत्ताक दिनापासून विविध भारतीय अनुसूचित भाषांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निकाल देण्यास प्रारंभ करणारी सेवा सुरू करण्याची घोषणा सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी बुधवारी केली.
दिवसासाठी खंडपीठ एकत्र येताच, सरन्यायाधीशांनी वकिलांना सांगितले की, सर्वोच्च न्यायालय अनुसूचित भाषांमध्ये विनामूल्य उपलब्ध निकाल उपलब्ध करून देण्यासाठी गुरुवारपासून इलेक्ट्रॉनिक-सुप्रीम कोर्ट रिपोर्टस् (ई-एससीआर) प्रकल्प कार्यान्वित करील. त्यात सध्या जवळपास ३४ हजार निकाल उपलब्ध आहेत. शिवाय त्यात शोध सुविधाही (सर्च) आहे. आमच्याकडे आता प्रादेशिक भाषांमध्ये १,०९१ निवाडे आहेत जे प्रजासत्ताकदिनी उपलब्ध केले जातील.
अनुसूचित २२ भाषाआसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, तमिळ, तेलगू, उर्दू, बोडो, संथाली, मैथिली आणि डोगरी, अशा २२ भाषा राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये आहेत.
मराठीत १४ निकाल‘आमच्याकडे ओरियामध्ये २१, मराठीमध्ये १४, आसामीमध्ये ४, कन्नडमध्ये १७, मल्याळममध्ये २९, नेपाळीमध्ये ३, पंजाबीमध्ये ४, तमिळमध्ये ५२, तेलगूमध्ये २८ आणि उर्दूमध्ये ३ निकाल उपलब्ध आहेत,’ असे सरन्यायाधीशांनी सांगितले.
वेबसाइटवर निकाल ई-एससीआर प्रकल्पाचा भाग म्हणून हे निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर, मोबाइल ॲपवर आणि नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रिडच्या (एनजेडीजी) जजमेंट पोर्टलवर उपलब्ध आहेत.