Supreme Court News: सर्वोच्च न्यायालयात अनेक प्रकारच्या याचिका दाखल होत असतात. कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात दादही मागितली जाते. वेगवेगळ्या प्रकारच्या याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणीसाठी येत असतात. अशाच एका याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी एका वकिलाला कनिष्ठ न्यायालयापासून ते उच्च न्यायालयापर्यंत सर्व न्यायाधीशांची माफी मागावी, असे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयातील न्यायाधीशांवर तथ्यहीन आणि आधारहीन आरोप केल्याप्रकरणी वकील वीरेंद्र सिंह याला दिल्ली उच्च न्यायालयाने दोषी ठरवले. याप्रकरणी ६ महिन्यांचा कारावास आणि दोन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. मात्र, तीन दिवस कारागृहात काढल्यानंतर वकील विरेंद्र सिंह यांच्यावतीने ज्येष्ठ वकील विभा दत्ता मखीजा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली.
प्रतिज्ञापत्र सादर करत कोणत्याही बिनशर्त माफी मागावी
आपल्या व्यवहाराबाबत वकील विरेंद्र सिंह यांना खेद आहे. बिनशर्त माफी मागण्यास ते तयार आहेत. मात्र, केवळ मौखिक माफी मागण्याबाबत सर्वोच्च न्यायालय समाधानी झाले नाही. याचिकाकर्त्यांना एक संधी द्यावी म्हणून सर्वोच्च न्यायालयाने एक सूचना केली. यानुसार, संबंधित वकीलाने प्रतिज्ञापत्र सादर करत बिनशर्त माफी मागितली पाहिजे. जिल्हा न्यायालय तसेच उच्च न्यायालयात प्रत्यक्ष जाऊन माफी मागितली पाहिजे. ज्या ज्या न्यायाधीशांवर आरोप केले आहेत, त्यांच्या समक्ष जाऊन माफीनामा द्यावा, असे आदेश डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिले.
दरम्यान, पुढील दोन दिवसांत माफीनामा द्यावा. त्यानंतर आम्ही पुन्हा यावर सुनावणी घेऊ, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिल्ली पोलीस वकील विरेंद्र सिंह याला घेऊन सर्व न्यायालयात जात आहेत.