नवी दिल्ली : 'चौकीदार चोर है', या वक्तव्याप्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने स्पष्टीकरण मागितले आहे. भारतीय जनता पार्टीच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवरुन सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना ही नोटीस बजावली आहे.
सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना 22 एप्रिलपर्यंत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. राफेल डीलमध्ये 'चौकीदार चोर है' असे सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात म्हटल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. त्यामुळे राहुल गांधी यांनी या वक्तव्याचा चुकीच्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाशी संबंध जोडल्याचे कोर्टाने म्हटले आहे. तसेच, याप्रकरणी पुढील सुनावणी येत्या 23 एप्रिलला सुप्रीम कोर्टात होणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी राफेल डील प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला मोठा झटका देत, पुन्हा सुनावणी होणार असल्याचे म्हटले होते. त्यावेळी, राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना पत्रकारांसमोर म्हटले होते की, कोर्टानेही चौकीदार चोर है असे सांगितले आहे. त्यामुळे राफेल प्रकरणात राहुल गांधी यांनी, कोर्टाने जे म्हटलेले नाही तेच कोर्टाच्या तोंडी घालण्याचा प्रयत्न करून, न्यायालयाचा अवमान केला असल्याची तक्रार करत भारतीय जनता पार्टीच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.