ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 20 - जाट आरक्षण आंदोलनामुऴे दिल्लीचा ठप्प असलेला पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि उत्तरप्रदेश सरकारला नोटीसदेखील पाठवली आहे. या नोटीशीच उत्तर 2 दिवसांत देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
दिल्ली सरकारने जाट आंदोलनामुळे ठप्प झालेला पाणी पुरवठा पुन्हा सुरळीत करावा यासाठी याचिका केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ही नोटीस पाठवली आहे. हरियाणा सरकारला स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत. सोबतच हरियाणा सरकारला पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
न्यायालयाने दिल्ली सरकारने केलेल्या याचिकेवर नाखुषी दर्शवली आहे. सरकारने आपापसांत चर्चा करुन हे प्रश्न सोडवणं अपेक्षित असताना न्यायालयात याचिका केल्याबद्दल न्यायालयाने दिल्ली सरकारला चांगलंच खडसावलं. दिल्लीचे पाणीपुरवठा मंत्री कपिल मिश्रा यांच्या न्यायालयातील उपस्थितीवरुनदेखील न्यायालयाने नाराजी दर्शवली.