लखनऊ: लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसं राजकीय वातावरण तापू लागलं आहे. लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असताना, भाजपानं पुन्हा राम मंदिराचा राग आळवला आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी कायदा तयार करण्याचं विधान नुकतंच उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केलं होतं. आता याच मुद्यावर उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्यानं वादग्रस्त विधान केलं आहे. सर्वोच्च न्यायालयदेकील आमचंच आहे. त्यामुळे राम मंदिर उभारणारच, असं उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री मुकुट बिहारी वर्मा यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. बहराईचमधील केसरगंज विधानसभेचं प्रतिनिधीत्व करणारे भाजपा आमदार आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री मुकुट बिहारी वर्मा यांना राम मंदिराच्या उभारणीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयदेखील आमचंच आहे, असं म्हटलं.'भाजपा विकासाच्या मुद्यावर सत्तेवर आला आहे. मात्र तरीही राम मंदिराची उभारणी होणारच. कारण तो आमचा संकल्प आहे. सध्या हा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे आणि सर्वोच्च न्यायालयदेखील आमचंच आहे,' असं वर्मा म्हणाले. मुकुट बिहारी वर्मा फक्त न्यायालयावरच थांबले नाहीत. त्यापुढे जात न्यायपालिका, प्रशासन, देश आणि मंदिर आमचं आहे, असंही ते म्हणाले या विधानावरुन वाद होताच वर्मा यांनी सारवासारव केली. 'आपण देशाचे नागरिक आहोत. त्यामुळे आपला देशाच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, असा आपल्या विधानाचा अर्थ होता,' अशा शब्दांमध्ये त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. न्यायालय आमच्या सरकारचं आहे असं मी म्हटलं नाही, असं स्पष्टीकरणही वर्मा यांनी दिलं.
सुप्रीम कोर्टदेखील आमचंच, राम मंदिर उभारणारच- भाजपा आमदार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2018 11:24 AM