नवी दिल्ली : १६ डिसेंबर २०१२ रोजी झालेल्या दिल्लीतील ‘निर्भया’ बलात्कार व खून खटल्यातील फाशीची शिक्षा झालेल्या चार आरोपींच्या अपिलांवर लवकर निकाल व्हावा यासाठी ‘ओव्हर टाइम’ करण्यास न्या. दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशांचे खंडपीठ सोमवारी राजी झाले.यानुसार न्या. दीपक मिश्रा यांच्या खंडपीठापुढे या आरोपींच्या अपिलांवर येत्या १८ जुलैपासून प्रत्येक सोमवारी व शुक्रवारी दु. २ ते सा. ६ अशी प्रत्येक दिवशी सलग चार तास सुनावणी होईल. न्यायालयाची नियमित कामाची वेळ सा. ४ पर्यंत आहे. म्हणजेच अपिलांची सुनावणी पूर्ण होईपर्यंत हे तीन न्यायाधीश सोमवारी व शुक्रवारी दोन तास ‘ओव्हर टाइम’ करतील.हे खंडपीठ नियमितपणे उपलब्ध नसते. सरन्यायाधीश वेळोवेळी त्याचे गठन करत असतात. सोमवारी असेच या विशेष खंडपीठाचे गठन झाले व अपिले सुनावणीस आली तेव्हा आरोपींसाठी न्यायालयाने नेमलेले विशेष ज्येष्ठ वकील संजय हेगडे यांनी अशी विनंती केली की, अधेमधे तुकड्या-तुकड्याने सुनावणी घेण्याऐवजी दीर्घकाळ सलग सुनावणी घेणे अधिक श्रेयस्कर होईल व त्यामुळे अपिलांवर निकालही लवकर होऊ शकेल. ही सूचना मान्य करून खंडपीठाने या अपिलांवर १८ जुलैच्या सोमवारपासून दर सोमवारी व शुक्रवारी दु. २ ते सा. ६ अशी सलग सुनावणी घेण्याचे ठरविले.मुकेश (२९ वर्षे), पवन गुप्ता (२२), विनय शर्मा (२३) व अक्षय ठाकूर (३१) या चार आरोपींना सत्र न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा दिल्ली उच्च न्यायालयाने कायम केली आहे. त्याविरुद्ध आरोपींनी केलेली अपिले दाखल करून घेऊन सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या फाशीला अंतरिम स्थगिती दिली आहे. या अपिलांवर आता दोन वर्षांनी अंतिम सुनावणी होईल. हेगडे मुकेश व गुप्ता या आरोपींसाठी तर रामचंद्रन शर्मा व ठाकूर या आरोपींसाठी काम पाहात आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सुप्रीम कोर्ट करणार ‘ओव्हर टाइम’!
By admin | Published: July 12, 2016 3:37 AM