ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १ - इशरत जहाँ चकमक प्रकरणी गुजरात पोलिसांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर सुनावणीस न्यायालयाने तयारी दर्शवली आहे.
वकील एम एल शर्मा यांनी ही याचिका दाखल केली आहे. मुंबई हल्यातील माफीचा साक्षीदार डेव्हीड हेडली याने मुंबई न्यायालयात दिलेल्या माहितीच्या आधारे ही मागणी करण्यात आली आहे. इशरत जहाँ ही लष्कर-ए-तोयबाची प्रशिक्षित हस्तक आणि सुसाईड बॉम्बर होती अशी माहिती डेव्हीड हेडलीने न्यायालयात दिली होती. याचिकेद्वारे पोलिसांना नुकसानभरपाई देण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे.