नवी दिल्ली- ताज महालच्या संरक्षणासाठी पुरातत्त्व विभाग योग्यप्रकारे काम करत नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. ताजमहालाच्या परिसरामध्ये कीडे आढळून आल्याबद्दलही न्यायालयाने काळजी व्यक्त केली. हे थांबविण्यासाठी पुरातत्त्व विभागाने काय केले असे न्यायालयाने विचारलं.पुरातत्त्व विभागाने योग्य प्रकारे काम केले असते तर ही वेळ आलीच नसती. पुरातत्त्व विभाग ज्या पद्धतीने स्वतःचा बचाव करत आहे हे अत्यंत धक्कादायक आहे. या कामासाठी पुरातत्त्व विभागाची गरज आहे की नाही हे तुम्ही (केंद्र सरकार) ठरवा अशा कडक शब्दांमध्ये न्यायाधीश एम. बी. लोकूर, दीपक गुप्ता यांनी केंद्र सरकारची बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एएनएस नाडकर्णी यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.गेल्या सुनावणीच्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने ताज महालाची काळजी घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची मदत घेता येणे शक्य आहे का असा प्रश्न विचारला होता. त्याला नाडकर्णी यांनी केंद्रीय पयार्वरण आणि वन खाते सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेवर विचार करत असल्याचे सांगितले. तर यमुनेचे पाणी साचून राहिल्यामुळे किडे आढळून येत असल्याचे पुरातत्त्व विभागाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी सांगितले.
'तुम्ही नीट काम केलं असतं तर ताजमहालाची ही स्थिती झाली नसती'- सर्वोच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2018 3:24 PM