नवी दिल्ली: यमुनेच्या पाण्याच्या पातळीत विक्रमी वाढ झाल्याने दिल्लीकरांच्या अडचणीत भर पडली आहे. सध्या पाण्याची पातळी कमी होत असली तरी संकट कायम आहे. मुसळधार पावसानंतर दिल्लीत यमुना धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. नदीचा प्रवाह कायम आहे. यमुनेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने अनेक भागात बिकट परिस्थिती झाली आहे. सखल भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.
मुसळधार पाऊस आणि यमुना नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने सर्वोच्च न्यायालयाजवळ पाणी साचल्याचे दिसून आले. तसेच राजघाटाजवळ पाणी साचले आहे. यमुनेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीसह सार्वजनिक आणि खासगी पायाभूत सुविधांवर परिणाम झाला आहे. नदीजवळ राहणाऱ्या लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे.
भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांत उत्तर भारतात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या अनेक भागात 'मुसळधार पाऊस' होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. याचपार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन करुन दिल्लीतील परिस्थितीबाबत माहिती घेतली. नरेंद्र मोदी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना फोन करुन दिल्लीतील पूरस्थितीबद्दल चर्चा केली. अमित शाहा यांनी त्यांना परिस्थितीची माहिती दिली आहे. यमुना नदीची पाणी पातळी कमी होण्याचा अंदाज असल्याचे अमित शाह यांनी नरेंद्र मोदींना सांगितले. तसेच परिस्थिती सुधारण्याची शक्यता असल्याचेही शाह म्हणाले
दिल्लीत तीन दिवसांपासून पाऊस नसताना परप्रांतांमधून आलेल्या महापुराचे पाणी शिरल्यामुळे पूर्व आणि उत्तर दिल्लीसह बदरपूर ते जैतपूरपर्यंत किनाऱ्यावरील विविध भागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, यमुनेच्या पाण्याची पातळी शुक्रवारपर्यंत ओसरू लागेल, असा दिलासा देणारा अंदाज केंद्रीय जल आयोगाने वर्तवला आहे. भारतातील ७२ टक्के जिल्ह्यांना पुराचा गंभीर फटका बसला असून, त्यापैकी केवळ २५ टक्के जिल्ह्यांमध्ये पूर अंदाज केंद्रे किंवा पूर्व चेतावणी प्रणाली असल्याची माहिती समोर आली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सर्वांत कमी पूर अंदाज केंद्रे आहेत. त्यामुळे पर्यटकांना माहिती मिळण्यात अडचण आली.