मुंबई: अंगावर रॉकेल ओतून पत्नीला जाळून ठार मारल्याबद्दल जन्मठेप झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील भगवान नथुजी श्रीरामे या आरोपीस सर्वोच्च न्यायालयाने अपिलाचा निर्णय होईपर्यंत जामिनावर सोडले होते. परंतु आता अपील फेटाळून जन्मठेप कायम केली गेल्याने भगवान यास पुन्हा अटक करून उर्व रित शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात टाकावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला.अन्य एका महिलेशी संबंध असलेल्या भगवान याने १९ एप्रिल १९९ रोजी पत्नी सरला हिला दारुच्या नशेत जाळून ठार मारले होते. त्यावेळी दिनेश व मंगेश हे त्यांचे तीन वर्षांहून कमी असलेले दोन मुलगेही भाजले होते. या खुनाबद्दल पुसद येथील सत्र न्यायालयाने भगवानला जानेवारी २००१ मध्ये जन्मठेप ठोठावली होती. त्याची ही शिक्षा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एप्रिल २००६ मध्ये कायम केली होती.भगवान ५ जून १९९९ पासून अटकेत होता. सर्वोच्च न्यायालयात अपील केल्यावर त्याने तेथे जामिनासाठी अर्ज केला. तोपर्यंत त्याची ११ वर्षे पाच महिने २४ दिवसांची शिक्षा भोगून झाली आहे, असा अहवाल अमरावती जिल्ह्यातील मोरशी कारागृह अधीक्षकांनी दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २०११ मध्ये भगवानला १० हजार रुपयांच्या जामिनावर सोडले होते. हा जामीन अपिलाचा अंतिम निकाल लागेपर्यंत होता व दरम्यानच्या काळात भगवानला दर महिन्याच्या पहिल्या तारखेला पुसदच्या सत्र न्यायालयात हजेरी लावायचीहोती.आता अंतिम सुनावमीनंतर न्या. संजय कृष्ण कौल व न्या. के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने भगवानचे अपील फेटाळून त्याची जन्मठेप कायम केली. त्याचप्रमाणे त्याचा जामीन रद्द करून त्यास उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी पुन्हा अटक करण्याचा आदेश दिला. परिणामी गेली आठ वर्षे बाहेर राहिलेल्या भगवानला आता पुन्हा तुरुंगात जावे लागेल.
जामिनावरील जन्मठेपेच्या कैद्यास पुन्हा अटक होणार- सुप्रीम कोर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 2:53 AM