ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 19 - महात्मा गांधींच्या हत्येसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) जबाबदार असल्याचं वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना फटकारले आहे. माफी मागा अथवा मानहानीच्या खटल्याला सामोरे जा असं स्पष्ट शब्दात न्यायालयाने सांगितलं आहे. न्यायालयाने राहुल गांधींना उत्तर देण्यासाठी 27 जुलैपर्यंत मुदत दिली आहे.
मार्च 2014मध्ये ठाणे येथे झालेल्या रॅलीत महात्मा गांधींच्या हत्येला आरएसएस जबाबदार असल्याचं वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं. यानंतर राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आपल्याविरोधात दाखल गुन्हा रद्द करावा यासाठी राहुल गांधींनी मे 2015 मध्ये सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
'तुम्ही आरएसएसविरोधात असं वक्तव्य करुन संघटनेशी संबंधित प्रत्येक व्यक्तीला एकाच ठिकाणी कसे बसवू शकता', असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे. 'तुम्ही अशाप्रकारे एखाद्या संघटनेविरोधात आरोप नाही करु शकत', असंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. राहुल गांधींच्या वकिलांनी तथ्य आणि सरकारी रेकॉर्डच्या आधारे हे वक्तव्य केल्याचं सांगत बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
जर राहुल गांधी माफी मागण्यास तयार नसतील तर मग त्यांना खटल्याला सामोरे जावं लागेल असं सर्वोच्च न्यायलयाने स्पष्ट केलं आहे. सुनावणी 2 आठवड्यांसाठी स्थगित करण्यात यावी अशी मागणी यावेळी राहुल गांधींकडून करण्यात आली. मात्र जस्टीस दिपक मिश्रा आणि आर एफ नरिमन यांच्या खंडपीठाने राहुल गांधींची मागणी फेटाळून लावली. माझे वकील कपिल सिब्बल 2 आठवडे व्यस्त असल्याने तोपर्यंतचा वेळ देण्याची मागणी राहुल गांधींनी केली होती. 27 जुलैला पुढील सुनावणी होणार आहे.