ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - बँकांचे हजारो कोटी रुपये थकवून परदेशात पसार झालेल्या आणि परदेशातील आपल्या मालमत्तांची अद्याप पूर्ण माहिती न देणाऱ्या विजय माल्ल्या यांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कडक शब्दात फटकारले. तसेच पुढच्या चार आठवड्यांत परदेशातील सर्व मालमत्तांचे तपशील सादर करण्याचे आदेश न्यायालयाने त्यांना दिले आहेत.
ब्रिटिश कंपनी दियागोकडून मिळालेल्या 40 दशलक्ष डॉलर (सुमारे 265 रुपये) रकमेचे काय केले अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने माल्ल्याकडे केली. माल्ल्यांनी त्यांची युनायटेड लिकर लिमिटेड कंपनी दियागो या ब्रिटिश कंपनीला विकली होती." 40 दशलक्ष डॉलर रकमेबाबत तुमच्याकडून न्यायालयाला काहीही उत्तर मिळालेले नाही. तुम्ही दिलेल्या उत्तराने न्यायालयाचे समाधान झालेले नाही. तसेच तुमच्याकडून विदेशातील मालमत्तेचे योग्य विवरण सादर केलेले नाही, असे न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
दरम्यान, विजय माल्ल्यांनी स्विस बँकांमध्येही पैसे ठेवले होते, अशी माहिती महान्यायवादी मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली. विविध बँकांचे सुमारे 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून विजय माल्ल्या यावर्षीच्या मार्च महिन्यामध्ये देशातून पसार झाले होते. सध्या ते युनायटेड किंग्डममध्ये राहत आहे.