Thackeray Group In Supreme Court: गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत आहेत. एकीकडे पक्षातील दिग्गज नेते, आमदार, खासदार, नगरसेवक साथ सोडताना दिसत असून, शिंदे गटात प्रवेश करत आहेत. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाच्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिल्याची माहिती मिळाली आहे.
गेल्या वर्षी जून महिन्यात शिवसेना पक्षात मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांना बरोबर घेत वेगळा गट बनवला. तसेच या गटासह त्यांनी भाजपाशी हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. तसेच शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
ठाकरे गटाच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार
फेब्रुवारी महिन्यात ही याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच यावेळी ठाकरे गटाने शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात केलेल्या सुनावणीत हे प्रकरण विधानसभेच्या अध्यक्षांकडे सोपवले. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी ठाकरे गटाने आपल्या याचिकेत केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाच्या या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.
दरम्यान, शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाला मिळणार, यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगासमोर प्रदीर्घ सुनावणी झाली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा मोठा निर्णय दिला. आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का होता. तसेच ठाकरे गटासमोर मोठा पेच निर्माण झाला.