नवी दिल्ली : दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांच्या बहुचर्चित पद्मावती सिनेमाचा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आता पद्मावती सिनेमा प्रदर्शित करण्याच्या वादात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने सुद्धा नकार दिला आहे. पद्मावती सिनेमा प्रदर्शित करण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणी आज झाली. यावेळी सेन्सॉर बोर्डच्या कामात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार देत याचिका फेटाळून दिली आहे. पद्मावती सिनेमाबाबत सेन्सॉर बोर्ड काम करत आहे, त्यामुळे याप्रकरणात सुप्रीम कोर्ट कशाप्रकारे लक्ष घालेल, असा सवाल सुद्धा यावेळी केला.
दरम्यान, पद्मावती या सिनेमाला मध्य प्रदेशात बंदी घालण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतला आहे. यामुळे दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असलेल्या संजय लीला भन्साळींच्या या सिनेमाला चांगलीच झळ बसणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, राजपूत समाजाने केलेल्या जोरदार विरोधामुळे आधीच संजय लीला भन्साळी यांनी पद्मावतीचे प्रदर्शन लांबणीवर टाकल्याचे जाहीर केले आहे.राजपूत समाजाच्या नेत्यांनी शिवराज सिंह यांच्याकडे आपली बाजू मांडली. हा चित्रपट राजपूत समाजाचा अपमान करत असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. या समाजाच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मध्य प्रदेशात पद्मावती दाखवण्यात येणार नाही असे चौहान यांनी सांगितल्याचे वृत्त आहे.