नवी दिल्ली: दिल्ली उच्च न्यायालयानंतर आता सर्वोच्च न्यायालयाकडूनही हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांना दणका बसला आहे. स्वामी चक्रपाणी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन अखिल भारतीय हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुका लढवण्यास परवानगी देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी विनंती केली होती. पण, सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.
न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, स्वामी चक्रपाणी यांची याचिका फेटाळण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण नाही. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, पक्षांतर्गत भांडण सुरू आहे आणि प्रतिस्पर्धीही महासभेच्या अध्यक्षपदावर दावा करत आहेत. अशा परिस्थितीत न्यायालय कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. तर, स्वामी चक्रपाणी यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी त्यांची याचिका स्वीकारण्याची विनंती न्यायालयाला केली.
दिवाणी न्यायालयात प्रकरण निकाली काढण्याची सूचना
न्यायमूर्ती बॅनर्जी यांनी हे प्रकरण दिवाणी न्यायालयात निकाली काढण्याची सूचना केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनुसार, चक्रपाणी यांना अखिल भारतीय हिंदू महासभा या राजकीय पक्षाचे अध्यक्ष म्हणून मान्यता देण्यात आली होती, परंतु निवडणूक आयोगाने काही दिवसांनंतर ही मान्यता मागे घेतल्याचा दावा करण्यात आला होता.