नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांना गुजरात हायकोर्टानंतर आता सुप्रीम कोर्टानेही दणका दिला आहे.
2015 मध्ये मेहसाणामध्ये दंगल भडकवल्याप्रकरणी वीसनगर कोर्टाने हार्दिक पटेल यांना दोषी ठरविले होते आणि दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. या निर्णयाविरोधात हार्दिक पटेल यांनी गुजरात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने ही याचिका फेटाळली होती. त्यानंतर हार्दिक पटेल यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली.
दरम्यान, याप्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने तात्काळ सुनावणी करण्यास नकार दिला आहे. तसेच, या प्रकरणाची पुढील सुनावणी करण्यासाठी 4 एप्रिलला होणार आहे. त्यामुळे हार्दिक पटेल यांच्या निवडणूक लढण्याच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. कारण, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख सुद्धा 4 एप्रिलच आहे.
आरक्षणाच्या मुद्यावरून केलेल्या आंदोलनात हार्दिक पटेल विरुद्ध विविध 17 गंभीर गुन्ह्यांची नोंद पोलिसांनी केली आहे. अशा प्रकारचे गंभीर गुन्हे असले तर निवडणूक लढवायला परवानगी दिली जात नाही. त्यामुळे या प्रकरणांना स्थगिती द्यावी अशी मागणी हार्दिक पटेल यांनी कोर्टात केली आहे.
हार्दिक पटेल यांनी 21 फेब्रुवारीला उत्तर प्रदेशमध्ये सपा मुख्यालयात अखिलेश यादव यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी पटेल यांनी सपा-बसपा युतीचे स्वागत केले होते. तसेच ही युती भाजपाला हरवू शकते असेही म्हटले होते. लोक भाजपापासून त्रासलेले असून त्याना सुटका हवी आहे, असे वक्तव्य पटेल यांनी केले होते.