निवडणुकीपूर्वी अजित पवारांना 'सुप्रीम' दिलासा; घड्याळ चिन्हाबाबत कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय! 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 01:18 PM2024-10-22T13:18:24+5:302024-10-22T13:51:39+5:30

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीतही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवू शकणार आहेत.

Supreme court relief to Ajit Pawar before elections An important decision of the court regarding the party symbol | निवडणुकीपूर्वी अजित पवारांना 'सुप्रीम' दिलासा; घड्याळ चिन्हाबाबत कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय! 

निवडणुकीपूर्वी अजित पवारांना 'सुप्रीम' दिलासा; घड्याळ चिन्हाबाबत कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय! 

NCP Ajit Pawar ( Marathi News ) : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या पक्षाचे घड्याळ हे चिन्ह गोठवण्याची मागणी कोर्टाने अमान्य केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीतही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवू शकणार आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हा मूळ पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गटाला दिल्यानंतर शरद पवारांच्या पक्षाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. याप्रकरणाचा अंतिम निकाल अद्याप येणं बाकी आहे. मात्र या निकालापूर्वी आता होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाचं घड्याळ चिन्ह गोठवण्यात यावं, अशी मागणी शरद पवारांच्या पक्षाने केली होती. आज याबाबतचं प्रकरण सुनावणीसाठी न आल्याने शरद पवारांच्या पक्षाच्या वकिलांनी हे प्रकरण कोर्टासमोर मेन्शन केलं. मात्र यावेळी कोर्टाने घड्याळ चिन्ह गोठवण्यास नकार दिला आहे.
 
अजित पवारांकडून एबी फॉर्म वाटण्यास सुरुवात 

सोमवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे  उमेदवार यादी जाहीर न करताच संबंधित उमेदवारांना हे एबी फॉर्म दिले जात आहेत. अजित पवार गटातील मंत्री आणि काही आमदारांना सोमवारी अजित पवार यांच्या देवगिरी या बंगल्यावर बोलवण्यात आले. तिथे स्वतः पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते जवळपास १७ उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. यात प्रामुख्याने पक्षाचे मंत्री आणि विद्यमान आमदारांचा समावेश आहे. उरलेल्या उमेदवारांना मंगळवारी एबी फॉर्म दिले जाणार असून पक्षाची अधिकृत उमेदवार यादी बुधवारी जाहीर केली जाणार असल्याचे अजित पवार गटातील सूत्रांनी सांगितले. महायुतीमध्ये अजित पवार गटाला ५५ ते ६० जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसार पक्षाने तयारी सुरू केली आहे.

एबी फॉर्म मिळालेले उमेदवार आणि मतदारसंघ

अजित पवार -बारामती, छगन भुजबळ -येवला, दिलीप वळसे पाटील - आंबेगाव, हसन मुश्रीफ - कागल, धनंजय मुंडे - परळी, नरहरी झिरवाळ - दिंडोरी, अनिल पाटील -अमळनेर, धर्मरावबाबा आत्राम -अहेरी, अदिती तटकरे - श्रीवर्धन, संजय बनसोडे -उदगीर, दत्तात्रय भरणे - इंदापूर, माणिकराव कोकाटे - सिन्नर, हिरामण खोसकर -इगतपुरी, दिलीप बनकर - निफाड, सरोज अहिरे - देवळाली, अण्णा बनसोडे -पिंपरी तसेच माजी केंद्रीय मंत्री दिवंगत माणिकराव गावित यांचे चिरंजीव भरत गावित नवापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाकडून आपल्याला एबी फॉर्म मिळाल्याचे गावित यांनी सांगितले.
 

Web Title: Supreme court relief to Ajit Pawar before elections An important decision of the court regarding the party symbol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.