नवी दिल्ली: सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी शुक्रवारी पूर्ण झाली. यावेळी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने हा निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे आता न्यायालय हे प्रकरण विशेष तपास पथकाकडे सोपवणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. गुजरातमध्ये झालेल्या सोहराबुद्दीन बनावट चकमक खटल्याची सुनावणी करणाºया मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाचे लोया न्यायाधीश होते. एका सहकाºयाच्या कुटुंबातील लग्नासाठी नागपूरला गेले असता, १ डिसेंबर २०१४ रोजी त्यांचे अचानक निधन झाले होते. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा हे या खटल्यात एक आरोपी होते. न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूनंतर शहा यांना आरोपमुक्त केले गेले होते.गेल्या काही महिन्यांमध्ये न्या. लोया मृत्यूप्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने संबंधित असलेली दोन प्रकरणं मुंबई उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्यात आली होती.
नागपूर येथे 1 डिसेंबर 2014 रोजी हृदयक्रिया बंद पडून न्या. लोया यांचा मृत्यू झाला. तशी इस्पितळातील नोंद आहे. ते आदल्या दिवशी एका सहका-याच्या मुलीच्या विवाह समारंभाला उपस्थित होते. ते ज्या खटल्याची सुनावणी करत होते त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. न्या. लोया यांच्या बहिणीने न्या. लोया यांच्या मृत्यूशी संबंधित परिस्थिती आणि सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्याशी असलेल्या संबंधाच्या अनुषंगाने मीडियाकडे संशय व्यक्त केल्याननंतर हे प्रकरण पुढे आले होते. महाराष्ट्रातील पत्रकार बी.आर. लोणे यांची याचिका विचारार्थ घेऊन सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्या. ए.एम. खानविलकर, डी.वाय. चंद्रचूड यांच्या न्यायपीठाने सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला.