नवी दिल्ली: बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांना सर्वोच्च न्यायालयानं जोरदार दणका दिला आहे. मुख्यमंत्री असताना उभारण्यात आलेल्या स्मारकांवर आणि मूर्तींवर खर्च करण्यात आलेला पैसा परत करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. या प्रकरणी 2009 मध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी हा निकाल दिला. या प्रकरणातील पुढील सुनावणी 2 एप्रिल होणार आहे. ही सुनावणी मे महिन्यानंतर घेण्याची विनंती मायावतींच्या वकिलांनी केली होती. मात्र ही विनंती न्यायालयानं अमान्य केली. मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री असताना राज्यात मोठ्या प्रमाणात पुतळे उभारण्यात आले. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. त्या प्रकरणी 2009 मध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली. या प्रकरणावर जवळपास 10 वर्षांनी सुनावणी झाली. 'प्रथमदर्शनी या प्रकरणाकडे पाहताना बसपा अध्यक्षांनी पुतळ्यांवर खर्च करण्यात आलेला जनतेचा पैसा परत करावा,' असं न्यायालयानं म्हटलं. या प्रकरणातील पुढील सुनावणी 2 एप्रिल रोजी होईल, असं सरन्यायाधीशांनी सांगितलं. मायावती मुख्यमंत्री असताना राज्यात अनेक ठिकाणी हत्तींचे पुतळे उभारण्यात आले. याशिवाय मायावतींनी स्वत:चेही अनेक पुतळे उभे केले. याशिवाय मायावतींनी काही उद्यानंदेखील उभारली. यात त्यांचे आणि हत्तींचे पुतळे उभे केले. काशीराम आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही पुतळे त्यांनी उभारले. त्यावेळी समाजवादी पार्टीनं याचा जोरदार निषेध केला होता. मात्र आता भाजपाविरोधात या दोन्ही पक्षांनी आघाडी केली आहे. आगामी लोकसभा निवडणूक हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या साथीनं लढवणार आहेत.
पुतळ्यांवर खर्च केलेला जनतेचा पैसा परत करा; मायावतींना 'सर्वोच्च' धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 2:30 PM