नवी दिल्ली: कोरोना संकट काळात बँकांना ग्राहकांकडून ईएमआय वसूल न करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र अनेक बँकांनी व्याज वसुली सुरूच ठेवली. त्यावरून सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारची कानउघाडणी केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पुढे करून सरकार आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही, अशा शब्दांत न्यायालयानं सरकारला सुनावलं.आपत्ती प्रतिबंध कायद्याच्या अंतर्गत सरकारला विशेष अधिकार आहेत. त्यांचा वापर करून सरकार ईएमआयवरील व्याज माफ करून लोकांना दिलासा देऊ शकतं, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. कोरोनामुळे निर्माण झालेलं आर्थिक संकट, बेरोजगार, पगार कपात या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेनं देशातल्या बँकांना ईएमआय वसुली करताना नरमाईचं धोरण स्वीकारायचे आदेश दिले होते. ग्राहकांकडून ३१ ऑगस्टपर्यंत ईएमआय घेऊ नका, अशी सूचना रिझर्व्ह बँकेनं केली होती.
आरबीआयच्या मागे लपू नका, भूमिका स्पष्ट करा; व्याजवसुलीवरून केंद्राची 'सर्वोच्च' कानउघाडणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 12:53 PM