उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीमध्ये (Lakhimpur kheri) शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचे (violence) प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) स्वत:हून गंभीरतेने घेतले असून गुरुवारी सरन्यायाधीश एनवी रमण यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर सुनावणी घेतली जाणार आहे.
मंगळवारी लखीमपूर खीरी हिंसाचाराचा मुद्दा दोन वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात नेला होता. त्यांनी याचिका दाखल करून मंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करणे आणि त्यांना शिक्षा करण्याची मागणी केली होती. गेल्या तीन दिवसांपासून देशभरातील वातावरण संतप्त झाले आहे. भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने त्याची कार आंदेलक शेतकऱ्यांवर चढविल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री तिथे आपला मुलगा नव्हता असा दावा करत आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रकरण वाढत असल्याचे पाहून या मंत्रीपुत्रावर गुन्हा दाखल केला परंतू 8 जणांचा मृत्यू झालेला असला तरीदेखील एकालाही अटक केलेली नाही.
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी, राहुल गांधी हे नुकतेच लखीमपूरला पोहोचले असून त्यांनी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. या प्रकरणामुळे योगी सरकारसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या तोंडावर एवढा मोठा प्रकार घडल्याने त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
वकिलांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत गृह मंत्रालय आणि पोलिसांना मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश द्यावेत. हिसाचार आणि हत्येविरोधात उच्च स्तरीय न्यायिक तपास केला जावा. सीबीआयला सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करण्याचे तसेच ठराविक वेळेत चौकशी करण्याचे आदेश द्यावेत असे म्हटले आहे. यानुसार उद्या या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.